सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, मुंबई महापालिकेकडून सतर्क राहण्याचा इशारा

कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे.

२०१९-२०२० मध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सतर्क झली आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत तथापि या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

केईएम रुग्णालयात कोव्हिडबाधित मुलगी (वय १४) आणि महिला (वय ५४) या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे मृत्यू कोविडमुळे नसून अनेक गंभीर आजारांमुळे (Nephrotic सिंड्रोम with Hypocalcemic seizures, कॅन्सर) मुळे झाले असल्याचे रूग्णालय तज्ञांनी निश्चित केले आहे. तसेच हे रुग्ण मुंबई बाहेरील (सिंधुदुर्ग आणि डोंबिवली) याठिकाणी वास्तव्यास होते.

कोव्हिड १९ लक्षणे-

कोव्हिड-१९ च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.

तसेच योग्य काळजी घेतल्यास कोविड १९ आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. विशेषत गंभीर आजार तसेच कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदा. कर्करोग, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचा आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्याावा

वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या (फॅमिली) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोविड-१९ चा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना आवाहन

– लक्षणे असल्यास, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे.

– इतरांपासून अंतर राखणे,

– साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे,

– योग्य आहार व आराम करणे

कोविड-१९ साठी महानगरपालिकेची सुविधा –

मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स (Seven Hill) रुग्णालयामध्ये २० खाट (MICU), २० खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, ६० सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे २ अतिदक्षता (ICU) खाटा व १० खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येईल.

कोविड संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News