एसटीच्या तिकिट आरक्षणावर 15 % सूट; प्रवाशांना महामंडळाचा मोठा दिलासा!

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.

1 जूनला एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बसेससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

आगाऊ बुकींगवर 15 % सवलत

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरु राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

आषाढी आणि गणेशोत्सवात लाभ

येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत मंगळवार (1 जुलै) पासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

गणेशोत्सव तसेत आषाढीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, या काळात प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. शिवाय अनेक गोरगरिबांना एसटीच्या या नव्या सुविधेचा फायदा मिळणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News