महाराष्ट्र राज्याबाहेर 23 राज्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि संघटना ही कार्यरत आहेत. यातील राजस्थानमध्ये 3 आमदार हे शिवसेनेचे आहेत. याशिवाय नागालंड, त्रिपुरा, पंजाब, मनिपूर येथील काही आमदार व छोटे पक्ष शिवसेनेसोबत येऊ इच्छित आहेत. त्यामुळेच महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपसोबत राज्याबाहेरही शिवसेना सोबत येऊ पाहणार्या छोट्या पक्षांनासोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्षातील नेते विचार करत आहेत.
शिवसेना राष्ट्रीय पक्ष होणार का?
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल (30 जून) शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले. यामध्ये शिवसेनेचा राज्याच्या बाहेरही विस्तार केला जाणार आहे. शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा या अनुशंगाने पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पुढील राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक दिल्लीला घेण्याबाबतचे वक्तव्य करत, पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं सिमोल्लघंन होणार असल्याचे संकेत दिले.

हिंदीच्या मुद्द्यावरून शिवसेना अडचणीत?
पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारनं अखेर जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंदीआडून आपल्यालाच अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतेय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीचा मुद्द्यावर चर्चा झाली. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हिंदी सक्तीचे ढोल पिटल्याने आज फटका शिवसेनेला बसेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
शिवसेना पक्ष सध्या मराठी-हिंदी वादामुळे अडचणीत सापडला आहे. मराठी अस्मिता आणि स्थानिक भाषेच्या संरक्षणासाठी ओळखला जाणारा हा पक्ष आता हिंदी भाषेच्या वापरावरून टीकेचा विषय बनला आहे. पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधकांनीही याचा मुद्दा करून शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पक्षाची अशी स्थिती त्याच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पक्षाला आता स्पष्ट भूमिका घेऊन जनतेचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल. अन्यथा जनाधार गमावण्याची शक्यता आहे.