दहावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेची तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचं भविष्यातील होणार मोठं शैक्षणिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय टाळता येत असतो. दहावीचा निकाल यंदा 94.10 टक्के लागला होता, त्यामुळे उर्वरीत 6 टक्के विद्यार्थांसाठी या पुरवणी परीक्षेचे महत्व मोठे असते.
कधी होणार परीक्षा?
दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्य बोर्डाने दिली आहे. 86 हजार 641 विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. तर 34 हजार 393 विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे. ही परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये निकाल जाहीर होणार आहे, त्यामुळे यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

एसएससी बोर्डाकडून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे. सर्व विषयांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फी भरावी लागणार आहे, तर एक किंवा दोन विषयांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी फी भरावी लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती बोर्डाकडून लवकरच दिली जाणार आहे.
पुरवणी परीक्षेचे महत्व
दहावी ही शालेय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी पाया घालते. काही कारणांमुळे मुख्य परीक्षेत अपयश आले तरी विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा ही दुसरी संधी असते. ही परीक्षा त्यांच्या आयुष्यातील एक नवा मार्ग खुला करते.पुरवणी परीक्षा ही केवळ सुधाराची संधी नसून, आत्मविश्वास परत मिळवण्याचीही संधी असते. काही वेळा विद्यार्थ्यांना अपयशामुळे नैराश्य येते, पण पुरवणी परीक्षा त्यांना पुन्हा उठून उभे राहण्यासाठी मदत करते. ही परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र ठरतो – जसे की इयत्ता अकरावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम.