R Ashwin On Team India : टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने कर्णधारपदासाठी एका वाइल्ड कार्ड एंट्रीचा सल्ला दिला आहे. त्याच्या मते, जर संघाला एखाद्या युवा खेळाडूला कर्णधार बनवायचे असेल, तर त्याला आधी दोन वर्षे एखाद्या अनुभवी खेळाडूच्या नेतृत्वाखाली तयार केले पाहिजे. त्यानंतरच त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपवली जावी.
रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर निवड समितीला भारतीय टेस्ट टीमसाठी नवीन कर्णधार निवडण्याची सर्वात मोठी समस्या उभी राहिली आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, शुभमन गिल पुढील कर्णधार होऊ शकतो. तसेच जसप्रीत बुमराहही या स्पर्धेत आहे.

पण या दरम्यान, कर्णधारपदासाठी आणखी एक दावेदार देखील उभा राहिला आहे. माजी भारतीय क्रिकेटर रविचंद्रन अश्विन याने टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी एक ‘वाइल्ड कार्ड एंट्री’ देण्याचा सल्ला दिला आहे.
अश्विन काय म्हणाला?
आपल्या यूट्यूब शो ‘अॅश की बात’ मध्ये कर्णधारपदाबाबत बोलताना अश्विन बोलताना म्हणाला, “सर्वजण गिलचीच चर्चा करत आहेत, जसप्रीत बुमराहसुद्धा एक मोठा पर्याय आहे. पण आपण रवींद्र जडेजाला का विसरतो?”
जडेजा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला पुढील दोन वर्षांसाठी कर्णधार बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. जर संघ एखाद्या तरुण खेळाडूला कप्तान बनवू इच्छित असेल, तर त्याला आधी कोणत्यातरी अनुभवी खेळाडूच्या नेतृत्वाखाली २ वर्षे तयार करावे लागेल. नंतरच त्याला पूर्ण जबाबदारी द्यावी. तुम्हाला वाटेल की मी वाइल्ड कार्ड सुचवत आहे, पण जडेजा तुमच्यासाठी हे काम करू शकतात.’ असेही अश्विन म्हणाला.
रवि अश्विनने शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूला उपकप्तान बनवण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे त्याला संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव मिळेल. अश्विनने बोर्ड आणि सिलेक्टर्सना कप्तान निवडण्यासाठी एक सूचनाही दिली.
त्याने म्हटले, की “आपण का नाही कप्तानीसाठी ३-४ दावेदारांना बोलवतो आणि त्यांच्याकडून एक प्रेझेंटेशन घेतो? त्यात ते विस्ताराने संघासाठी आपले दृष्टीकोन मांडतील. ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये असे होते, तर मग भारतात का होऊ नये?”
जडेजा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्ती नंतर आता रवींद्र जडेजा टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. जडेजाने वर्ष २०१२ मध्ये टेस्ट डेब्यू केला होता. त्याने आतापर्यंत ८० टेस्ट सामने खेळले असून ३,३७० धावा केल्या आहेत आणि ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. भारत आणि इंग्लंड दरम्यान ५ टेस्ट सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे.