नवी दिल्ली: ‘ॲपल’ने आपल्या स्मार्टफोनचं भारतातील उत्पादन थांबवावं आणि ते अमेरिकेत सुरू करावं, अशी सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना केल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांच्या या दाव्याने एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर त्यांचा हा दावा खरा की खोटा अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत आता ॲपलने उत्पादन थांबवले तर हा भारतासाठी मोठा धक्का असेल असं मानलं जात आहे. नेमकं यामधील सत्य काय ते जाणून घेऊ…
ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेटे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर होता. माध्यमांशी संवाद साधताना विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले, “मी ‘ॲपल’चे मुख्याधिकारी टिम कूक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी, अशी सूचना मी केली आहे. टिम हे माझे मित्र आहेत. त्यांना मी नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. परंतु ते आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत असल्याचं समोर येत आहे. भारत स्वत:ची काळजी घेऊ शकतो. माझ्या सूचनेनंतर आता अमेरिकेतील निर्मिती क्षमता वाढवली जाणार आहे.”

भारतात हालचाली वाढल्या, सत्य काय?
या दाव्यानंतर नवी दिल्लीत हालचालींना वेग आला. सरकारकडून तातडीने ‘ॲपल’ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचं समजतंय. त्यानंतर भारतातील गुंतवणुकीची योजना कायम असून देशात मोठी निर्मिती सुविधा उभारण्याचा प्रस्ताव असल्याची हमी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘ॲपल’ने चीनमधील उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला असून हा व्यवसाय भारताकडे वळत आहे. असं असताना ट्रम्प यांच्यामुळे ‘ॲपल’ने भारतातील उत्पादन घटवलं, तर त्याचा मोठा फटका उत्पादन क्षेत्राला बसू शकतो. दरम्यान याबाबत ‘ॲपल’कडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
यावरून असे दिसते की तुर्तास जरी हे उत्पादन सुरू राहणार असले, तरी भविष्यात ट्रम्प यांनी दबाव टाकल्यास याबाबत काही निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र हे उत्पादन थांबल्यास याचा भारताला मोठा फटका बसु शकतो. मात्र यावर वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. चीनची बाजारपेठ कमी होत असताना कंपनीसाठी भारत ही उत्तम बाजारपेठ आणि उत्पादनासाठी उत्तर क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.