मुंबई: हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशावरून आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी खुला केला जाणार आहे.
दुचाकी, चारचाकी सर्वांसाठी नियम
दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवताना हेडफोन घालून प्रवास करणाऱ्यांची संख्या मुंबईत मोठी आहे. चित्रपट, रिल्स, क्रिकेट सामने पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे. मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर 22 मार्चला शिवनेरी बसचा चालक क्रिकेट पाहण्यात दंग होता. ही बाब एका प्रवाशाने चित्रित केली त्यानंतर प्रशासनाने अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. याबाबत थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दखल घेतली होती.

सरनाईक काय म्हणाले?
एक महिन्यापूर्वी याबाबत सुचना दिल्या गेल्या होत्या. पण अद्याप कार्यवाही झालेली नाही. याबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत मी संबंधितांना जाब विचारणार आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
आता तरी वाहनचालक याबाबत सतर्क होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या नियमांचे पालन केले गेले तर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.