रायगड-रत्नागिरी- कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राला पावसानं सोमवारी रात्रीपासून जोरदार झोडपून काढलंय. पोलादपूर, रोहा, महाड परिसरात नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणं आणि बंधाऱ्यांत पाणी जास्त झआल्यानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. बाजरपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत. सावित्रीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं महाड तालुक्यात भीतीचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या रहिवाशांच्या स्थलांतराची तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई-गोवा महामार्गालाही या पावसाचा फचका बसलाय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरुप प्राप्त झालेलं आहे.

रत्नागिरीतही मुसळधार पाऊस
रत्नागिरीत संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. माखझन बाजारपेठेत या पावसामुळं पाणी भरलं होतं. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, गडनदीला आलेल्या पुराण बाजारपेठेत या हंगामात दुसऱ्यांदा पाणी आलंय. रात्रीपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला अक्षरशः झोडपून टाकले आहे तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीच्या वर प्रवाही झाली आहे त्यामुळे नदीकिनारी लगतच्या नागरिकांना याचा फटका बसला आहे. कोदवली नदी पात्राबाहेर प्रवाहित झाल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय. आजूबाजूच्या गावातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या पाण्याचा फटका बसला आहे. एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले आहे
अनुस्कुरा मार्ग बंद
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजापूर- पाचल- कोल्हापूर रोडवर करंजफेण मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे
मुसळधार पावसाचा इशारा
मंगळवार आणि बुधवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतंय. पर्यटकांनीही या काळात कोकणात जाण्याचं टाळावं असंही सांगण्यात येतंय