प्रसिद्ध स्टंटमनचा सिनेमाच्या सेटवर मृत्यू, स्टंट करणं आलं अंगाशी, नेमकं काय घडलं?

अनेक अवघड आणि थरारक प्रसंग या स्टंटमनच्या  माध्यमातून शूट करण्यात येतात. या बदल्यात त्यांच्या जीवाची जोखीम असते. सीन यशस्वी झाला तरी त्याचं पडद्यावर फारसं श्रेय यांना कधीच मिळत नाही.

नागपट्टिनम– दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टंटमन राजू मोहनराज यांचा अपघाती मृत्यू झालाय. ‘वेट्टूवम’ या चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना ही दुर्दैवी घटना घडलीये. स्टंट करताना ही गाडी अनेकदा पलटी झाली आणि हा अपघात झाला.या स्टंटचा व्हिडीओसुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झालाय…

सेटवर नेमकं काय घडलं?

१. ‘वेट्टूवम’ या नवीन चित्रपटाचं शूटिंग नागपट्टिनममध्ये सुरु होतं

२. सेटवर एका धोकादायक कार स्टंटचं चित्रिकरण सुरू असताना दुर्घटना

३. स्टंटमन राजू एक एसयूव्ही गाडी चालवत होते

४. गाडी वेगाने एका रॅम्पवरून जाऊन उलटली आणि थेट खाली कोसळली

५. गाडीचा पुढील भाग जोरदारपणे जमिनीवर आपटला, ज्यामुळे राजू यांना गंभीर दुखापत

६. व्हिडिओमध्ये त्यांना गाडीतून बाहेर काढताना दिसत आहेत

७. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला

स्टंटमनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

एखाद्या चित्रपटात हिरो त्याच्या धाडसी अॅक्शनने भाव खाऊन जातो. पण प्रत्यक्षात स्टंटमॅन जिवावर उदार होऊन अभिनेत्यासाठी स्टंट करत असतो. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या स्टंटमनच्या सुरक्षेचा मुद्दा या दुर्घटनेमुळे उपस्थित झालाय.

स्टंट करणं अतिशय अवघड

चित्रपटात स्टंट करणं किती अवघड आणि घातक असू शकतं हे राजू यांच्या मृत्यूमुळे समोर आलंय. स्टंटमनच्या खडतर आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजू हे फार अनुभवी स्टंटमन होते.अनेक वर्षांपासून ते या इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. राजू मोहनराज यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्टंट दिग्दर्शक आणि स्टंटमॅन म्हणून काम केलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिलं. त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीये.

सिनेसृष्टीच्या पडद्यामागच्या घडामोडी समोर

सिनेमाच्या  पडद्यावर आपण अनेकदा हिरो हिरॉईन्सना पाहतो आणि त्यांच्या अभिनयाचं  कौतुक रतो. मात्र त्यामागे अनेकांची मेहनत असते. त्यात स्टंटमनची भूमिका अत्यंत महत्त्वाची  असते.. अनेक अवघड आणि थरारक प्रसंग या स्टंटमनच्या  माध्यमातून शूट करण्यात येतात. या बदल्यात त्यांच्या जीवाची जोखीम असते. सीन यशस्वी झाला तरी त्याचं पडद्यावर फारसं श्रेय यांना कधीच मिळत नाही. या जीवघेण्या स्टंटचा मोबदलाही फारसा नसतो. हे सगळे मुद्दे या अपघाताच्या निमित्तानं उपस्थित झालेत.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News