गुरुग्राममध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय टेनिस खेळाडू राधिका यादव हत्या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे. तिचे वडील दीपक यादव हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या राधिकाच्या एका म्युझिक व्हिडिओमुळे खूपच नाराज होते. आरोपी वडिलांनी तिला तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यास सांगितले होते, पण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने तो हटवण्यास नकार दिला होता.
स्टेट लेव्हल टेनिस खेळाडू राधिका यादव हिचा खून तिच्या वडिलांनीच गोळी झाडून केला. या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ४९ वर्षीय दीपक यादव (राधिकाचे वडील) यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले की, गावातील लोक त्यांना मुलीच्या कमाईवर अवलंबून असल्याबद्दल टोमणे मारत होते. यानंतर दीपकने राधिकाला तिची टेनिस अकॅडमी बंद करण्यास सांगितले होते. आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

राधिका यादव आणि ‘इनाम’च्या म्युझिक व्हिडिओमुळे वडील संतप्त
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार दीपक यादव हे आपल्या मुलीच्या म्युझिक व्हिडिओवरून अत्यंत रागावले होते. हा व्हिडिओ कलाकार INAAM च्या ‘कारवाँ’ या गाण्याचा होता, ज्याचे निर्माते झीशान अहमद होते आणि एक वर्षापूर्वी तो रिलीज झाला होता. या व्हिडिओमध्ये राधिका आणि INAAM एकत्र काही सीनमध्ये दिसले होते.
दीपक यादव यांना राधिकाचा म्युझिक व्हिडिओ अजिबात आवडलेला नव्हता. त्यांनी तिला तो इन्स्टाग्रामवरून हटवायला सांगितले. पण सोशल मीडियावर ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या राधिकाने त्यास नकार दिला. या गोष्टीमुळे वडील आणि मुलीमध्ये तणाव निर्माण झाला.
वडिलांनी पाठीत झाडल्या ३ गोळ्या
आरोपी वडिलांनी कबूल केले आहे की, जेव्हा ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती, तेव्हा त्यांनी आपल्या मुलीच्या पाठीत ३ गोळ्या झाडल्या. वेगळ्या मजल्यावर राहणारे दीपक यांचे भाऊ आणि राधिकाचे काका आवाज ऐकून वर गेले, तेव्हा त्यांनी पाहिले की राधिका जमिनीवर पडलेली आहे आणि रिव्हॉल्वर शेजारच्या ड्रॉईंग रूममध्ये पडलेले आहे. काकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
माहितीनुसार, राधिकाला टेनिस खेळताना खांद्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला प्रॅक्टिस थांबवावी लागली होती. पूर्णतः टेनिस सोडण्याऐवजी तिने एक टेनिस अकॅडमी सुरू केली होती. तिचे वडील एकदा गावात गेले असताना कोणीतरी त्यांना टोमणा मारला की तो मुलीच्या कमाईवर जगतोय. त्यानंतर दीपकने तिला अकॅडमी बंद करण्यास सांगितले होते.
राधिका यादव मर्डर केस मधील साक्षीदार
या प्रकरणात एफआयआर तिचे काका कुलदीप यादव यांनी नोंदवले आहे, जे आरोपी दीपक यादव यांचे लहान भाऊ आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले की सकाळी सुमारे १०:३० वाजता आवाज ऐकून ते वर गेले. त्यांनी पाहिले की राधिका बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाकघरात पडलेली होती आणि त्याच मजल्यावरील ड्रॉईंग रूममध्ये रिव्हॉल्वर पडलेला होता. माझा मुलगा आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
राधिकाची आईही त्या वेळी घरीच होती, पण त्यांनी कोणताही जबाब देण्यास नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या एका खोलीत होत्या आणि ताप असल्यामुळे त्यांनी खोलीला आतून कडी लावली होती.
कुलदीप यादव यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे की जेव्हा ते वर गेले, तेव्हा तिथे फक्त माझा भाऊ दीपक यादव, त्यांची पत्नी मंजू यादव आणि राधिका यादव ही तिघेच होते.