महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या परवानगीशिवाय त्यांच्या खासगी फोटो वा व्हिडीओ इंटरनेटवर लीक होण्याच्या घटनांवर अलीकडेच मद्रास आणि दिल्ली उच्च न्यायालयात सुनावण्या झाल्या. न्यायालयाने याला गंभीर मानसिक त्रास देणारी घटना मानली असून सरकार आणि सोशल मीडियावरील कंपन्यांना कठोर निर्देश दिले आहेत.
जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसोबत असं काही घडलं, तर घाबरून न जाता खालील उपाययोजनांद्वारे तुम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करू शकता:

1. लगेच कंटेंट रिपोर्ट करा
इंस्टाग्राम, फेसबुक, X (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इन-बिल्ट रिपोर्ट फिचरचा वापर करा. स्पष्टपणे नमूद करा की हा कंटेंट तुमच्या संमतीशिवाय अपलोड करण्यात आला आहे. भारतातील IT नियम 2021 आणि सुधारित नियम 2023 नुसार, सर्व प्लॅटफॉर्मना 24 तासांत तक्रार स्वीकारावी लागते आणि जास्तीत जास्त 15 दिवसांत निराकरण करावे लागते.
2. वेबसाईटशी थेट संपर्क करा
जर कंटेंट एखाद्या अशा वेबसाइटवर आहे जी तुमच्याद्वारे नियंत्रित नाही, तर WHOIS टूलद्वारे त्या वेबसाइटच्या मालकाची माहिती शोधा आणि त्यांना सौम्य व व्यावसायिक भाषेत ईमेल करून कंटेंट हटवण्याची विनंती करा.
3. सायबर क्राईमची तक्रार करा
राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी पोर्टल: www.cybercrime.gov.in
Sahyog पोर्टल: https://sahyog.mha.gov.in
हे सरकारी पोर्टल्स तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी आणि तक्रारीच्या सोडवणुकीसाठी उपयुक्त आहेत.
4. De-Index आणि Takedown विनंती करा
Google De-Index Tool: support.google.com/websearch/answer/6302812
या टूलद्वारे Google सर्चमध्ये तुमचा खाजगी कंटेंट दिसणार नाही. लक्षात ठेवा. कंटेंट इंटरनेटवरून हटवला जात नाही, फक्त सर्चमध्ये येणं थांबतं.
DMCA Takedown Notice: जर तुमचा कॉपीराइट असलेला कंटेंट दुसऱ्याने वापरला असेल, तर DMCA नोटिसद्वारे तो हटवण्याची मागणी करू शकता.
5. खास टूल्सचा वापर करा
Take It Down (Meta कडून):
https://takeitdown.ncmec.org
हा टूल अल्पवयीन व्यक्तींच्या नग्न वा आक्षेपार्ह फोटो हटवण्यासाठी आहे. तुमच्या फाईलचा “hash” तयार केला जातो (खरी फाईल अपलोड केली जात नाही) आणि तो hash Meta, TikTok सारख्या प्लॅटफॉर्मवर जुळणारा कंटेंट शोधून हटवतो.
StopNCII.org:
https://stopncii.org
हा टूल विशेषतः NCII (Non-Consensual Intimate Images) म्हणजेच संमतीशिवाय शेअर करण्यात आलेल्या खाजगी फोटोंसाठी आहे. hash तयार करून ते संबंधित प्लॅटफॉर्म्सला पाठवले जाते. यामध्ये 90% पेक्षा जास्त यशाची शक्यता आहे आणि आतापर्यंत 3 लाखांहून अधिक इमेज हटवल्या गेल्या आहेत.
गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर पावलं उचला
जर प्रकरण अत्यंत गंभीर असेल (उदा. बदनामी, अश्लीलता, सायबर बुलीइंग), तर कायदेशीर नोटीस, Cease and Desist लेटर, किंवा न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक आहे.
तुमचा आत्मविश्वास गमावू नका. तुम्ही एकटे नाही आहात. योग्य पावलं उचलून तुम्ही तुमचा सन्मान आणि गोपनीयता दोन्ही वाचवू शकता.