State Government – महायुती सरकार आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता हेड कॉन्स्टेबल यांना देखील किरकोळ गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला असून, गृह विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तपासाची प्रक्रिया अधिक गतिमान व प्रभावी होईल…
दरम्यान्, यापुढे किरकोळ गुन्हे, साधी भांडणे, लहान चोरी, साधी फसवणूक यासारख्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी करू शकतील. त्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येणार आहे. गुन्ह्यांची वाढती संख्या, पीएसआय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असलेला तपासाचा भार, आणि ग्रामीण भागात गुन्हे उकलण्यात होणारा विलंब या बाबी गृह विभागाच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे तपासाची प्रक्रिया अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय परिणामकारक ठरेल…
“तपासातील विलंब टाळण्यासाठी व नागरिकांना वेळीच न्याय मिळावा यासाठी हेड कॉन्स्टेबलना किरकोळ गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.” या निर्णयामुळे तपासाची गती वाढेल, अधिकाऱ्यांवरील कामाचा भार कमी होईल आणि नागरिकांना अधिक लवकर न्याय मिळेल. पोलीस यंत्रणेचा कार्यकाळ व पारदर्शकता यामध्ये वाढ होऊन, हा निर्णय परिणामकारक ठरेल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.