जबलपूर – मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही शाह यांना फटकारत कारवाईचे आदेश दिले. यानंतर आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनीही भारतीय लष्कराविषयी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. यावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत.
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी जबलपुरातील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाषणाच्या ओघात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सैन्य आणि सैनिकांचा उल्लेख करत, देश त्यांच्यापुढे नतमस्तक असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यावरुन वाद निर्माण झालाय.

नेमकं काय म्हणाले जगदीश देवडा
माझ्या मनात खूप राग होता. लोक पर्यटक म्हणून भेटायला गेले. तिथे, त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर आणि महिलांना बाजूला उभे केल्यानंतर, त्यांनी त्यांच्यासमोर पतीला गोळ्या घातल्या. मुलांसमोर गोळीबार केला. त्या दिवसापासून माझ्या मनात तणाव होता. जोपर्यंत याचा बदला घेतला जात नाही, आणि ज्या मातांचे सिंदूर पुसणारे दहशतवादी आणि दहशतवादाला वाढवणारे आका, ते जोपर्यंत नेस्तनाबूत होत नाहीत तोपर्यंत शांततेतचा श्वास घेऊ शकणार नाही, अशी भावना होती. यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद द्यायला हवेत. आणि संपूर्ण देश आणि देशाचे सैन्य आणि सैनिक त्यांच्यासमोर नतमस्तक आहेत. त्यांच्या चरणी सगळा देश नतमस्तक आहे, त्यांनी जे उत्तर दिलंय, त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणून त्यांच्यासाठी टाळ्यांचा मोठा कडकडाट व्हायला हवा.
काँग्रेसकडून देवडा यांच्या वक्तव्यावर आक्षेप
मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यां वक्तव्यानंतर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. भाजपाचे नेते सातत्यानं भारतीय सैन्याचा अपमान करत असल्याचं प्रियंका गांधी यांनीही म्हटलं. तर इतर काँग्रेसची नेतेही देवडा यांच्यावर तुटून पडले.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी
‘भाजप नेत्यांकडून भारतीय सैन्याचा सतत होणारा अपमान अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. मध्य प्रदेशच्या एका मंत्र्यानं महिला सैनिकावर अश्लील टिप्पणी केली आणि आता त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी सैन्याचा अपमान केला आहे. संपूर्ण देशातील जनतेला सैन्याच्या शौर्याचा आदर आहे. मात्र भाजपाचे नेते सैन्याचा अपमान करण्यात मग्न आहेत. भाजपा या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्यासाठी जोर लावताना दिसतेय. असं करुन भजपा देशाला आणि सैन्याला काय संदेश देत आहे?
जगदीश देवडा यांचं स्पष्टीकरण
या सगळ्या प्रकरणाची राजकीय चर्चा सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेसनं आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचं ते म्हणालेत. हे षडयंत्र करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केलीय.
जगदीश देवडा यांनी स्पष्टीकरणात सांगितलं की, काँग्रेस नेते हे चुकीच्या पद्धतीने पसरवत आहे. वृत्तवाहिन्यांवर मोडतोड करुन माझं विधान दाखवण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. जबलपूरच्या सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवकांच्या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालो होतो, त्यावेळी मी म्हणालो होतो की, देशाच्या सैन्यानं ऑपरेशन सिंदूरमध्ये जी कामगिरी बजावली आहे, त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि देशाची जनता भारतीय सैन्याच्या चरणी नतमस्तक आहे. त्यांना आम्ही प्रणाम करतो. त्यांचा सन्मान करतो, सैन्याबाबत जितकं बोलावं तितकं कमी आहे. हे माझे शब्द होते, ते मोडतोड करुन चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात येतंय. हे षडयंत्र करत असणाऱ्यांविरोधात कारवाई होण्याची गरज आहे.
राजीनामा मागणारे काँग्रेसचे नेते विचलीत झाले असल्याचंही देवडा म्हणालेत. या प्रकरणी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचही त्यांनी सांगितलंय.
भाजपाची काय भूमिका
भाजपानं या प्रकरणात देवडा यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय. भाजपाचे प्रवक्ते आशिष अग्रवाल यांनी या प्रकरणी काँग्रेसला लक्ष्य केलंय. अग्रवाल म्हणाले आहेत की, जशी दृष्टी असते तसाच दृष्टिकोन तयार होतो. , काँग्रेसजनांचीही तीच अवस्था आहे. त्यांना ना देशाबाबात सन्मान आहे ना देशाच्या सैन्याबाबत. त्यामुळे देवडा यांचा भाव आणि शब्द यांची मोडतोड करुन भावार्थ काढणं काँग्रेसी करणारच. जगदीश देवडा म्हणाले आहेत की पाकिस्तानवर प्रहार करणाऱ्या देशाच्या सैनिक आणि सैन्यापुढे भारतातील जनता नतमस्तक आहे. आता काँग्रेसी त्यांच्या भावनेने हे वक्तव्य मोडतोड करुन त्याची चर्चा करो, मात्र भाजपा देशाच्या सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक आहे.