आयपीएलचा सीझन सध्या रंगतदार वळणावर आहे. प्ले ऑफ्समधील स्थान निश्चित करण्यासाठी संघांकडून जंग जंग पछाडले जात आहे. आज 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी ठिक 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. क्रिकेट , आयपीएल रसिकांच्या नजरा या सामान्याकडे असणार आहे. कारण अनेक अर्थांनी आजचा सामना महत्वाचा आहे.
मुंबई की गुजरात, कोण कुणावर भारी?
सामना वानखेडे स्टेडियममध्ये होत असल्याचा फायदा मुंबई इंडियन्सना नक्कीच होणार आहे. मुंबई इंडियन्सने या सीझनमध्ये जोरदार कमबॅक केलं. सुरूवातीचा पराभवाची मालिका संपवत संघाने सलग विजय मिळवले. सध्या खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. संघाकडे 14 गुण असून 1.274 चा नेट रन रेट आहे. त्यामुळे या सीझनमध्ये सर्वोत्तम नेट रन रेट मुंबईचा राहिलेला आहे. सामना जिंकल्यास मुंबईला स्थान कायम ठेवण्यास फायदा होईल, तसेच नेट रन रेटचा पुढील काळात फायदा होईल.

दुसरीकडे गुजरातने देखील चमकदार कामगिरी केली आहे. संघाने खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघाकडे सध्या 14 गुण असून, आज विजय मिळाल्यास गुजरात गुणतालिकेत टॉपवर जाईल. गुजरात नेट रन रेट देखील 0.867 आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवत आपलं आव्हान अधिक मजबूत करण्याचा गुजरात टायटन्सचा मानस असणार आहे.
आजवर आयपीएल इतिहासातील मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मधील सामन्यांवर लक्ष टाकले असता दिसते की, शेवटच्या 6 सामन्यांपैकी गुजरात टायटन्सने 4 वेळा तर मुंबई इंडियन्सने 2 वेळा विजय संपादन केला आहे. या आकडेवारीत गुजरात टायटन्स सरस दिसत आहे. परंतु, वानखेडे मैदान आणि आपली याच्या जोरावर मुंबई इंडियन्स आजचा सामना जिंकेल असं क्रिकेट समीक्षक आणि जाणकार सांगत आहे. शिवाय मुंबईची सांघिक कामगिरी हा मुद्दा महत्वाचा आहे.
‘प्लेयिंग इलेव्हन’ पुढीलप्रमाणे
गुजरात टायटन्स
शुभमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), बी साई सुदर्शन, शाहरुख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, राशिद खान, कैगिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, वाशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अरशद खान, जयंत यादव, निशांत सिंधु, कुलवंत खेजरोलिया
मुंबई इंडियन्स
रयान रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जैक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथुर