ICC New Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने टेस्ट आणि वनडे सोबतच टी20 फॉर्मेट अधिक रोमांचक बनवण्यासाठी पुढील महिना, म्हणजेच जूनपासून काही नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वनडेमध्ये २ नवीन चेंडूंचा वापर, कन्कशन सब्स्टिट्यूट नियमात बदल तसेच बाउंड्री लाईनवर झेल पकडण्याच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. या नियमांमधील बदलांचा सर्वाधिक परिणाम वनडे फॉर्मेटमध्ये दिसून येईल, ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होणार आहे.
३५ व्या ओव्हरनंतर फक्त एका चेंडूचा वापर केला जाईल
वनडे फॉर्मेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून फलंदाजांचा दबदबा पूर्णपणे दिसून येतो आहे. दोन्ही टोकांवरून दोन नवीन चेंडूंचा वापर होत असल्यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळवणे थोडे अवघड झाले आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, ICC ने वनडेमध्ये दोन चेंडूंच्या वापराबाबत नियमात बदल करताना आता १७-१७ ओव्हर्सपर्यंत दोन चेंडू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, म्हणजे ३५ ओव्हर्सनंतर फक्त एका चेंडूचा वापर केला जाईल. त्यामुळे शेवटच्या ओव्हर्समध्ये रिव्हर्स स्विंग मिळवण्यास गोलंदाजांना मदत होईल आणि फलंदाजांसाठी वेगाने धावा काढणे थोडे कठीण होईल.

३५ व्या ओव्हरपासून कोणता चेंडू वापरायचा, हे फील्डिंग करणाऱ्या संघाचा कर्णधार ठरवेल. तसेच जर सामना कोणत्याही कारणामुळे २५ ओव्हर्स किंवा त्यापेक्षा कमी ओव्हर्सचा खेळला गेला, तर त्या स्थितीत फक्त एका चेंडूचा वापर होईल. वनडेतील हा नवीन नियम २ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेत लागू केला जाईल
बाउंड्री लाइनवरील कॅच आणि DRS संबंधीही होणार नियमांमध्ये बदल
सध्या फील्डिंगचा दर्जा इतका वाढला आहे की बाउंड्री लाइनवर अनेक अप्रतिम झेल घेतले जात आहेत, जे पूर्वी कल्पनेबाहेर होते. मात्र, काही वेळा अशा निर्णयांवर खेळाडूंच्या नाराजीचाही सूर दिसतो. याच पार्श्वभूमीवर ICC ने बाउंड्री लाइनवर घेतल्या जाणाऱ्या झेलांबाबत तसेच डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टम) नियमातही काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती लवकरच देण्यात येईल.
कन्कशन सब्स्टीट्यूटच्या नियमात बदल
ICC ने कन्कशन सब्स्टीट्यूट (डोक्याला इजा झाल्यावर पर्यायी खेळाडू) नियमातही मोठा बदल सुचवला आहे. यानुसार, आता प्रत्येक संघाला सामना सुरू होण्याआधी ५ कन्कशन रिप्लेसमेंट खेळाडूंची नावे मॅच रेफरीकडे सादर करावी लागतील. या यादीत एक विकेटकीपर, एक स्पिनर, एक अष्टपैलू, एक फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज यांचा समावेश असणार आहे. सामन्यादरम्यान जर एखादा खेळाडू कन्कशनमुळे बाहेर गेला, तर त्याच्या भूमिकेशी जुळणारा पर्यायी खेळाडूच संघात घेतला जाईल.
हा नियम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर लागू होणार असून, याची सुरुवात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात १७ जूनपासून सुरू होणाऱ्या दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेपासून होईल.