Rohit Sharma – हिटमॅन, आक्रमक फलंदाज आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा उपस्थित होते. कर्णधार रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर रोहितने मुख्यमंत्र्यांची मंगळवारी रात्री भेट घेतली.
रोहित केवळ वनडे क्रिकेट खेळणार…
टिम इंडियाने गेल्या वर्षी म्हणजे 29 जून 2024 रोजी टी-20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हा रोहितने टी-ट्वेंटीच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर आता रोहितने कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केलेली आहे. यानंतर रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. दरम्यान, रोहितच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहित शर्माने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर रोहित शर्मा याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

दुसऱ्यांदा रोहित शर्मा वर्षावर…
दरम्यान, भारताने 29 जून 2024 रोजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टी-20 चा वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा रोहित शर्मा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेला होता. तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. 5 जुलै 2024 रोजी रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल हे वर्षा बंगल्यावर गेले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्ल्डकप विजेता संघातील खेळाडूंचा वर्षांवर स्वागत केलं होतं. त्यांचे अभिनंदन केले होते. यानंतर 11 महिन्यानंतर रोहित शर्मा वर्षा बंगल्यावर जाण्याची ही दुसरी वेळ आहे.
मुख्यमंत्र्यांची खास पोस्ट…
दुसरीकडे रोहित शर्माने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “रोहिलता भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटले. वर्षा माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत केले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील आयुष्यासाठी यश मिळावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.