शेतकरी कर्जमाफी करा, अन्यथा मंत्र्यांना फिरु देणार नाही, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळं तुम्ही व सदाभाऊ खोत एकत्र येणार का? असा प्रश्न राजू शेट्टींना विचारला असता, जे सत्तेच्या वळचणीला जाऊन बसलेत. त्यांच्यासोबत आम्ही कधीही सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणार नाही. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहू, असे राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.

Raju Shetty : महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट शेतकरी कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार येईन ४-५ महिने झाले तरी शेतकरी कर्जमाफी झाली नाही. तसेच आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचीही नुकसान भरपाई सरकारने द्यावी, तसेच शेतकरी कर्जमाफी झाली नाहीतर मंत्र्यांना बाहेर फिरु देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मंत्र्यांना आडवा आणि तुडवा..

दरम्यान, आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहयला मिळेल. तसेच भविष्यात संघटनेकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि मंत्र्यांना फिरू देणार नाही…. एकतर मंत्र्यांना आडवा नाहीतर तुडवा अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असेल.

असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला इशारा दिला आहे. तसेच अवकाळी पावसामुळं कांदा, द्राक्षे, काजू, आंबा, तूर आदी पिकांचे नुकसान झालेय, त्याचे पंचनामे करुन सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

पंकजा मुंडेंची भेट कशासाठी?

दुसरीकडे सरकारने निवडणुकीच्या आधी विविध आश्वासनं दिली होती. पण एकही आश्वासन सरकारकडून पूर्ण झालेले नाही. लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहीणीला २१०० रुपये देऊ, असं सरकारने म्हटले होते. मात्र अजून १५०० रुपयेच देत आहे. राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. शेतकरी कर्जमाफी करू…, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सरकारने म्हटले होते.

परंतु सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे. असं राजू शेट्टी म्हणाले. तसेच कोल्हापुरातील पंचांगा नदीचे गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News