मुंबई: काल मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये राज्यसभा खासदार संजय राऊतांचे पुस्तक ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात राऊतांनी अनेक खळबळजनक दावे आणि खुलासे केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन अनेकदा मदत केली, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. यामुळे देशासह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
नेमकं काय प्रकरण?
आपल्या पुस्तकात संजय राऊत दावा करतात की, ‘नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते. तसंच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचं सरकार होतं. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील, तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली,’ यामुळे मोदींना मोठी मदत झाल्याचं सांगण्यात येतं.

दुसरीकडे, अमित शाहांच्या बाबतीत संजय राऊत म्हणतात की, ‘अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते, तडीपार होते. सीबीआय चौकशी सुरू होती. तेव्हा मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की अमित शाह यांना या प्रकरणात मदत करा. तेव्हा सीबीआय चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र कॅडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधून पवारांनी मदत केली होती,’ परंतु मोदी- शाहांनी शरद पवार आणि बाळासाहेबांना किती स्मरणात ठेवलं? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
राऊतांच्या पुस्तकात नेमकं काय?
पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शाहांची कशाप्रकारे मदत केली होती, याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडला आहे. हे पुस्तक राजकीय क्षेत्राशी संबंधित अनेक गौप्यस्फोटांनी भरलेलं असल्याचं सांगितलं जात आहे.