हिंदी सक्तीला केलेल्या कडाडून विरोधानंतर सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडतो आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मराठी माणूस मुंबईत दाखल झाला असून वरळी डोम आणि परिसरात तोबा गर्दीचे चित्र आहे. ठाकरेंना ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत. आजच्या मेळाव्यातून मराठी माणसाला नेमकी काय दिशा मिळते, शिवाय कोणता कानमंत्र मिळतो…हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
18 वर्षांनतर ठाकरे बंधू एका मंचावर
महायुती सरकारचा हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र येणार याची उत्सुकता आहे. शिवाय, राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातील मराठी जनतेचे देखील आजच्या या मेळाव्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा पाठिंबा?
महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले बॅनर्स विशेष चर्चेत आले आहेत. या मेळाव्याला शरद पवार आणि काँग्रेसच्या वतीनेही पाठिंबा असल्याचं बॅनर्सवरून दिसून येत आहे. ‘मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा,’ असा बॅनरवर मजकूर आहे. मुलुंड टोलनाक्यावर असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मराठी माणसाला दिशा मिळेल -राऊत
दरम्यान, ‘आजच्या या मेळाव्यातून राज्यातील मराठी माणसाला दिशा मिळेल,’ असं विधान खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे या मेळाव्याचे महत्व अधोरेखित होते, शिवाय ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू होती…त्याबाबत आज काही घोषणा होते का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. युतीच्या दिशेने ठाकरेंनी टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणून आजच्या या मेळाव्याकडे पाहता येईल. राज्यभरातून मोठ्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या या विजयी सभेला दिसत आहे.