महायुती सरकारचा हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र एका मंचावर दिसल्याने उत्साह आहे. शिवाय, राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे.या सभेतील भाषणातून राज ठाकरेंनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विशेष लक्ष्य केले. हिंदी सक्तीवरून त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
आम्ही फडणवीसांमुळे एकत्र, राज ठाकरेंचा टोला
विजयी सभेतील भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “आम्ही देवेंद्र फडणवीसांमुळे एकत्र आलो. इतर कोणतेही मुद्दे आम्हाला एकत्र आणू शकले नव्हते.” असं राज ठाकरेंनी म्हटले. शिवाय, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारला घेरलं. महाराष्ट्र आणि मराठीवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा -राज ठाकरे
यावेळी ‘कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा’ अशी घोषणा देखील राज ठाकरेंनी दिली. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधातील आंदोलन वगळता
ठाकरे बंधुंची पुढची भूमिका काय हे महत्वाचं ठरते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यावर भाष्य केले. जेव्हा-जेव्हा मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर अन्याय होईल, तेव्हा असेच उभे राहू, असे राज ठाकरे म्हटले. “मराठी माणसाला जाती-पातीच्या मुद्द्यावर विभागण्याचा प्रयत्न आगामी काळात होऊ शकतो, सावध रहा” असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थितांना केले.
ठाकरेंना ऐकण्यासाठी परिसरात तोबा गर्दी
हिंदी सक्तीला केलेल्या कडाडून विरोधानंतर सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडतो आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करत आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मराठी माणूस मुंबईत दाखल झाला असून वरळी डोम आणि परिसरात तोबा गर्दीचे चित्र आहे. ठाकरेंना ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत. आजच्या मेळाव्यातून मराठी माणसाला नेमकी काय दिशा मिळते, शिवाय कोणता कानमंत्र मिळतो…हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.