इस्रायल की इराण? १० दिवसांच्या युद्धात कोणाचे जास्त नुकसान झाले? जाणून घ्या

आजपासून बरोबर १० दिवसांपूर्वी म्हणजेच, १३ जूनला इजरायलने ईरानविरुद्ध ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या मोहिमेची सुरुवात केली होती. २२ जूनपर्यंत या ऑपरेशनला १० दिवस पूर्ण झाले. या १० दिवसांत दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले. सुरुवातीला इजरायलने ईरानवर वर्चस्व गाजवले, पण शेवटच्या काही दिवसांत ईरानने क्षेपणास्त्रांच्या जोरावर इजरायलला कडवे प्रत्युत्तर दिले. ईरानने सुरू केलेल्या हल्ल्यांपुढे इजरायलचे संरक्षण यंत्रणा अपयशी ठरल्या. या १० दिवसांच्या संघर्षात कोणत्या देशाचे नुकसान जास्त झाले, हे पाहूया.

ईरानचे नुकसान

ईरान आणि इजरायलमधील संघर्षाने पश्चिम आशियातील राजकारण व सुरक्षेला हादरवून टाकले. हा संघर्ष केवळ क्षेपणास्त्र आणि ड्रोनपुरता मर्यादित राहिला नाही, तर सायबर हल्ले, अणुठिकाणांवर हल्ले आणि सैनिकी मुख्यालयांपर्यंत पोहोचला.

१३ जून रोजी इजरायलने ‘रायझिंग लायन’ नावाच्या गुप्त मोहिमेद्वारे ईरानमधील नतांज, इस्फहान आणि अराक यांसारख्या महत्वाच्या अणुठिकाण्यांवर हल्ले केले. यात ईरानच्या अणुउद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

अधिकाऱ्यांनुसार, या हल्ल्यांत किमान २०० हून अधिक सैनिक, तांत्रिक तज्ज्ञ आणि वरिष्ठ रिव्होल्युशनरी गार्ड अधिकारी ठार झाले. काही महत्त्वाच्या अणुशास्त्रज्ञांचाही बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. अनेक लष्करी बेस उद्ध्वस्त झाले असून काही भागांत किरणोत्सर्जन (radiation leak) झाल्याचेही समोर आले आहे. ईरानची क्षेपणास्त्र प्रणाली आणि कमांड कंट्रोल सिस्टिम अंशतः निष्क्रिय झाली आहे.

इजरायलचे नुकसान

ईरानने इजरायलवर १,००० हून अधिक ड्रोन आणि ४५० क्षेपणास्त्रे डागली. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्रे इजरायलच्या ‘आयरन डोम’, ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि ‘अॅरो सिस्टम’ सारख्या हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच नष्ट केली.

तरीही काही क्षेपणास्त्रे नागरिक वस्त्यांमध्ये कोसळली. यामध्ये २४ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि २०० पेक्षा जास्त जखमी झाले. मात्र, इजरायलच्या सैन्य क्षमतेवर फारसा परिणाम झाला नाही. कोणतेही मोठे लष्करी तळ किंवा लढाऊ विमान अथवा अणुस्थाने नष्ट झाली नाहीत.

कोणाचे नुकसान अधिक?

या १० दिवसांच्या युद्धात ईरानचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अणुउद्योग, मानवी संसाधन व सैन्य संस्थांवर गंभीर परिणाम झाला. इजरायललाही नुकसान झाले, पण ते मुख्यतः नागरी पातळीवर होते. या युद्धातून स्पष्ट झाले की, केवळ शस्त्रसाठा असून चालत नाही, तर त्याची तंत्रज्ञान क्षमता व बचाव प्रणाली अधिक निर्णायक ठरते.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News