Bitchat : जॅक डोर्सीने लाँच केले नवे मेसेजिंग अ‍ॅप, इंटरनेटशिवाय चालेल, WhatsAppला देणार टक्कर

जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग अ‍ॅपसाठी इंटरनेटची गरज लागते म्हणून त्रास होतोय, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता एक असं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप लाँच झालं आहे जे इंटरनेटशिवायसुद्धा काम करेल. हे अ‍ॅप कुणी दुसरं नाही, तर ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी लाँच केलं आहे. चला तर नग या अ‍ॅपबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

इंटरनेटशिवाय चालणारं मेसेजिंग अ‍ॅप

ट्विटर (आता X) चे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी एक अनोखं आणि क्रांतिकारी मेसेजिंग अ‍ॅप लाँच केलं आहे, ज्याचं नाव आहे Bitchat. या अ‍ॅपची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. हे अ‍ॅप Bluetooth तंत्रज्ञानाद्वारे संदेश पाठवण्याची व प्राप्त करण्याची क्षमता ठेवतं.

जिथं WhatsApp आणि Telegram सारखी अ‍ॅप्स इंटरनेटवर अवलंबून आहेत, तिथं Bitchat कोणत्याही Wi-Fi किंवा मोबाइल डेटाशिवायसुद्धा काम करतं. हे अ‍ॅप विकेंद्रीकृत (decentralized) आहे, म्हणजे याचा कोणताही सेंट्रल सर्व्हर नाही, अगदी जसं डोर्सीचं Twitter चं प्रतिस्पर्धी Bluesky आहे.

Bitchat कसं काम करतं?

Bitchat हे ब्लूटूथ मेष नेटवर्क (Bluetooth mesh network) वर आधारित आहे. ही तंत्रज्ञान peer-to-peer (पीअर-टू-पीअर) कनेक्शनवर काम करते, जिथं जवळच्या डिव्हाइसेस एकमेकांशी जोडलेले असतात आणि संदेश एन्क्रिप्टेड स्वरूपात एका डिव्हाईसपासून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत पोहोचवला जातो.

या नेटवर्कमध्ये प्रत्येक डिव्हाइस node म्हणून काम करतं आणि संदेश पुढे पोहोचवण्यात मदत करतं. वापरकर्ते जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तेव्हा ते स्थानिक Bluetooth क्लस्टर ला कनेक्ट होतात व डिस्कनेक्ट होतात आणि अशा पद्धतीने संदेश एका डिव्हाइसपासून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत पास होतो.

डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार, जरी Bluetooth ची सीमा सुमारे 100 मीटर असली तरी Bitchat 300 मीटर पर्यंत संदेश पोहोचवू शकतं.

सुरक्षा आणि गोपनीयता

Bitchat मध्ये पाठवले जाणारे सर्व संदेश end-to-end एन्क्रिप्टेड असतात, म्हणजे फक्त पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच त्यांना वाचू शकतो. शिवाय हे संदेश सर्व्हरवर स्टोअर न होता, डिव्हाईसवरच सेव्ह होतात आणि डिफॉल्टने आपोआप डिलीट होतात.

डोर्सी म्हणाले की भविष्यात या अ‍ॅपमध्ये Wi-Fi Direct चा सपोर्टही दिला जाईल, ज्यामुळे अ‍ॅपची स्पीड आणि रेंज आणखी सुधारेल.

ग्रुप चॅट्स आणि रूम्स

Bitchat मध्ये ग्रुप चॅट्सना “Rooms” असं म्हटलं जातं, जे हॅशटॅग (#) ने सुरू होतात आणि पासवर्ड सुरक्षित असतात. जर एखादा युजर ऑफलाईन असेल, तर त्याच्यासाठी संदेश स्टोअर आणि फॉरवर्ड केले जाऊ शकतात, म्हणजे तो ऑनलाईन झाल्यावर तो त्या मेसेजेस पाहू शकतो.

साइनअपची गरज नाही

या अ‍ॅपचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचा वापर करण्यासाठी फोन नंबर किंवा ईमेलने साइनअप करण्याची गरज नाही. हे पूर्णपणे peer-to-peer नेटवर्कवर चालतं, जिथं प्रत्येक डिव्हाईस क्लायंट आणि सर्व्हर दोन्ही म्हणून काम करतं.

Bitchat ची उपलब्धता

सध्या Bitchat फक्त Apple युजर्ससाठी TestFlight द्वारे उपलब्ध आहे आणि याचं 10,000 युजर्सचं लिमिट आधीच पूर्ण झालं आहे. डोर्सींच्या मते, हे अ‍ॅप लवकरच Apple App Store मध्ये सुद्धा उपलब्ध होईल.

Android साठी, GitHub वर अशी माहिती दिली आहे की हे अ‍ॅप प्लॅटफॉर्म एग्नॉस्टिक आहे, म्हणजे ते कोणत्याही प्लॅटफॉर्मसाठी बनवता येईल. Bluetooth LE APIs, एकसारखा पॅकेट स्ट्रक्चर आणि एन्क्रिप्शन मेथड वापरून हे Androidवरही विकसित करता येईल.

Bitchat हे एक नवीन युगातील मेसेजिंग अ‍ॅप आहे, जे इंटरनेटशिवायसुद्धा काम करतं, सुरक्षित आहे, गोपनीयता जपणारं आहे आणि तुमचा डेटा सर्व्हरवर ठेवत नाही. जॅक डोर्सी यांचा हा प्रयोग भविष्यात WhatsApp आणि Telegram सारख्या अ‍ॅप्ससाठी मोठं आव्हान ठरू शकतो.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News