वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

व्याजासाठी राज्याच्या एकूण महसूलापैकी एक तृतीयांश खर्च करते. एक लाख कोटीची महसूल तूट महाराष्ट्र सारख्या पुढारलेल्या राज्याला भूषणावाह नसल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

Ambadas Danve – राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांवर केलेल्या भाषणात केला. सरकारने पावसाळी अधिवेशनात ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्या विरोधात दानवे यांनी आज परिषद सभागृहामध्ये भूमिका मांडली.

देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राटा वाटा जास्त…

कृषी खात्याला पुरवणी मागण्यात फक्त २२९ कोटी रुपये मिळाले आहे. संपूर्ण अर्थसंकल्पाचा विचार केला तर कृषी खात्याला ९ हजार कोटीची तरतूद केली आहे.. यातील ५ हजार कोटी रुपये फक्त नमो योजनेला आहेत. कृषी विभाग मोठ्या प्रमाणावर महत्वाचा असताना कृषी मंत्री यांनी पाहिजे तेवढ्या निधीची मागणी केली नाही की मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्र बाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत महाराष्ट्र देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून सर्वात जास्त वाटा उचलतो. मात्र केंद्र सरकार राज्याला परतावा देण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे दानवे म्हणाले..

महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे कित्येक वर्षांपासून बँकांना पैसे गेले नाही..पुरवण्या मागण्या बघितल्या तर महाराष्ट्राची ढासळलेली आर्थिक स्थिती यामधून दिसून येते. राज्याच्या आर्थिक स्थिती भाजलेल्या शेपटीला तूप लावण्यासारखी झाली आहे.. महाराष्ट्राची स्थिती पुन्हा एकदा बिघडली असल्याचे पुरवण्या मागण्यावरून दिसून येते, असल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूल तूट ९८ हजार कोटी रुपयांनी वाढली आहे.. यावर्षी दोन लाखाची तूट राज्याच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News