फार्मा कंपनी USV च्या चेअरपर्सन लीना तिवारी यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांनी मुंबईच्या वरळी परिसरात दोन भव्य डुप्लेक्स फ्लॅट ६३९ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या व्यवहाराने देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी निवासी मालमत्ता डील आहे. हा व्यवहार प्रति चौरस फूट २.८३ लाख रुपयांहून अधिक दराने झाला आहे. एकूण २२,५७२ चौरस फूट क्षेत्र या व्यवहारात समाविष्ट आहे. हे फ्लॅट ४० मजली इमारतीच्या ३२व्या ते ३५व्या मजल्यांपर्यंत आहेत. ही इमारत वरळी सी फेसवर आहे.
USV ही कंपनी ग्लायकोमेट, इकोस्प्रिन आणि रोजडेसारख्या औषधांचे उत्पादन करते. ही औषधे मुख्यतः मधुमेह आणि हृदयविकारांसाठी वापरली जातात.

६३.९ कोटी रुपयांहून अधिक स्टॅम्प ड्युटी
एका रिपोर्टनुसार, लीना तिवारी यांनी या व्यवहाराच्या नोंदणीसाठी ६३.९ कोटी रुपयांहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि GST भरले आहेत. हे सर्व खर्च धरून त्यांनी या डीलसाठी सुमारे ७०३ कोटी रुपये खर्च केले आहेत. फार थोड्या लोकांना माहिती असेल, की लीना तिवारी या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. लीना तिवारी या प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांच्या पतींचे नाव प्रशांत तिवारी असून ते USV चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तेही प्रसिद्धीपासून दूर राहून दीर्घकालीन रणनीतीवर लक्ष केंद्रित करणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात.
Tracxn च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ४,८४० कोटी रुपये होता. लीना तिवारी यांच्याकडे १०-१२ निष्ठावंत अधिकाऱ्यांची एक टीम आहे जी काम पाहते. त्यांनी वेळेची चांगली समज आहे आणि त्या दिखाव्याकडे लक्ष देत नाहीत.
भारतातील श्रीमंत महिलांपैकी एक
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत लीना तिवारी यांचंही नाव आहे. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ३.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्या मुंबईस्थित औषधनिर्माता कंपनी USV च्या चेअरपर्सन आहेत, जिथे डायबेटीस आणि हृदयविकाराशी संबंधित औषधं जसे Glycomet, Ecosprin आणि Roseday तयार केली जातात.
भारताच्या इंसुलिन मार्केटमध्ये USV कंपनीची मजबूत उपस्थिती आहे. कंपनीचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ५११ दशलक्ष डॉलर्स इतके आहे. लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी हे IIT आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असून कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. २०१९ साली त्यांनी सामाजिक कार्यासाठी ३४ कोटी रुपये दान दिले होते.