नाशिक: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा निघाला आहे, काही शेतकऱ्यांनी तो बाजार समित्यांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे, तरी काहींनी कांदा साठवला आहे. यंदा उन्हाळी कांदा उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
नाशिक कांद्याची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव 800 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

दरांवरून राजू शेट्टी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी लासलगाव बाजार समितीत भेट दिली होती. दरम्यान, त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळेच कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहे. गेल्यावेळी प्रोडूसर कंपन्यांमार्फत खरेदी करत मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे नाफेडने थेट बाजार समितीत उतरून कांद्याची खरेदी केली पाहिजे. शेतकऱ्यांजवळ असलेली विजेची थकबाकी ही शेतकऱ्यांचीच आहे का? तितकी वीज शेतकऱ्यांनी वापरली आहे का? त्याची तपासणी केली पाहिजे,” असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी काळात रस्त्यावर उतरेल.
कांद्याचं गणित बिघडलं!
गेल्या 7 दिवसांत कांद्याची आवक 2 लाख 37 क्विंटल झाल होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1 लाख 44 हजार क्विंटलची आवक झाली. या आठवड्यात उन्हाळी कांद्याला कमीत कमी 840 रुपये तर जास्तीत जास्त 1250 रुपये दर होता. या कोसळलेल्या दरांमुळे बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे.