CM Devendra Fadnavis : कारागृहातील कैद्यांकडून बनवलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयर उपस्थित होते. अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ जून २०२५ या कालावधीत त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात असलेल्या वस्तूची विक्रीही करण्यात येणार आहे.
कोणकोणत्या वस्तू विक्रिसाठी…
दरम्यान, अमरावती मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, पुणे जिल्ह्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या कारागृहातील कैद्यांकडून निर्मित वस्तूंचा समावेश आहे. यात सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, सतरंज्या, साड्या, बेकरी पदार्थ, देवघर, शोभेच्या वस्तू, कपडे, बिस्कीट तसेच इतर सर्व दैनंदीन वापराच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी दिली भेट…
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ जून २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांनी भेटी देऊन वस्तूंची खरेदी केली. प्रदर्शनाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनीही प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन पाहणी करीत काही वस्तुंची खरेदीही केली.