नवी दिल्ली: सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अलीकडे सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाखांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील सोन्यामधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने वर्षभरात जवळपास 57 टन सोन्याची खरेदी केली आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते.
वर्षभरात 57.5 टन सोने खरेदी
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 57.5 टन सोने भारताच्या आरबीआयने घेतले आहे. यामुळे देशाच्या सुवर्ण भंडारात चांगलीच वाढ झाली आहे. देशाचा सुवर्ण साठा 879.6 टन झाला आहे. आरबीआयकडून मागील सात वर्षांतील सर्वात मोठी सोने खरेदारी झाली आहे. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर रिझर्व्ह बँकेकडून आपले सुवर्ण साठा वाढवला जात आहे. आरबीआयने सोन्याची खरेदी जागतिक अस्थिरता आणि डॉलरची परिस्थिती पाहून केली आहे. जगभरातील केंद्रीय बँका अमेरिकन डॉलरची निर्माण झालेली परिस्थिती आणि पश्चिम अर्थव्यवस्थेवरील दबाबामुळे सोने घेत आहेत. भारतसुद्धा त्या दिशेनेच पाऊल टाकत आहे. त्यामुळे आपला सुवर्ण भंडार मजबूत आणि संतुलित केला जात आहे.

जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणूक
भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक आहे. अडचणीच्या काळात ते कामाला येते. युध्दजन्य परिस्थिती, आर्थिक मंदी, कर्ज अशा काळात सोने सर्वसामान्य व्यक्ती असो वा बँका यांना मोठे साथ देते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येते. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोका देखील सोने खरेदीमुळे कमी होईल. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर 2022-23 मध्ये 35 टन सोने खरेदी केले होते. 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. 2024-25 मध्ये सोन्याची पुन्हा जोरदार खरेदी आरबीआयने केली. त्याला कारण डॉलरबाबत निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड द्यायचे असल्यास अशा प्रकारची सुरक्षित गुंतवणूक करणे क्रमप्राप्त आहे.