मुंबई : आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जात आहे. पण का साजरे केले जातात, याच्यामागे इतिहास काय? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तसेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचे या खास दिनी स्मरण केले जाते. आज आपण हा खास दिवस का साजरा केला जातो आणि यामागे काय इतिहास आहे ते जाणून घेऊयात…
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास वेगळा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतांत मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 1 मे हा दिवस या राज्यासाठी अतिशय खास, कारण हा दिवस आहे, महाराष्ट्र दिनाचा. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960 मध्ये म्हणजेच 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आणि याच दिवशी महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील करण्यात आली होती.

कामगार दिनाचा इतिहास
दरवर्षी 1 मे रोजी हा दिवस असतो. 1886 मध्ये अमेरिकेत कामगारांनी 8 तासांच्या कामासाठी आंदोलन केले. या घटनेनंतर 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून निश्चित झाला. कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. पूर्वी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली. 1889 मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांशी एकता प्रदर्शित करण्यासाठी 1 मे हा दिवसअधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून 1 मे हा दिवस कामगार चळवळीतील यश साजरे करण्याचा आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन करणारा दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो.