Vaishnavi Hagawane Suicide Case : पुण्यातील मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे यांचा १६ मे २०२५ रोजी त्यांच्या सासरी मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला आत्महत्या मानली गेलेली ही घटना, शवविच्छेदन अहवालात शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे हत्या असण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणाने समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेसंबंधीच्या प्रश्नांना पुन्हा वाचा फोडली आहे.

वैष्णवीच्या सासरच्यांवर हुंडाबळीचे गंभीर आरोप
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि २ कोटी रुपयांच्या जमिनीची मागणी करण्यात आली होती. लग्नानंतर वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. तिच्या गरोदरपणातही तिच्या चारित्र्यावर शंका घेऊन मारहाण करण्यात आली. या छळामुळे वैष्णवीने २०२३ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
आरोपींना अटका आणि राजकीय पडसाद
सासरच्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवीकडे पैसे मागितले होते. ते दिले नाहीत, तेव्हा वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पती, सासू आणि मेहुणीला आधीच अटक केली आहे. पण सासरे राजेंद्र हगवणे आणि मेहुणे सुशील हगवणे फरार होते. आता पुणे पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे.
राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते, मात्र या प्रकरणानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आरोपी मोकाट फिरत होते
राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे गेल्या ७ दिवसांपासून फरार होते. दोघांनाही आज (२३ मे) अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी दोघांचेही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये दोघेही तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, पोलिसांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच, पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. आज पहाटे ४:३० वाजता पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांनाही ताब्यात घेतले.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जखमांच्या खुणा
वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली गेली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा पती शशांक आणि सासरच्या मंडळींनी घरातील छोट्या-मोठ्या कारणांवरून तिच्याशी भांडणे सुरू केली होती. ते तिच्या चारित्र्यावरही शंका घेत होते आणि तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी तिचे मानसिक शोषण केले. पोस्टमॉर्टम अहवालातही वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे अनेक निशाण आढळले आहेत.
राजकीय प्रतिक्रिया आणि सामाजिक संताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची दखल घेत, न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे.
वैष्णवीची १० महिन्यांची मुलगी आजी-आजोबांकडे
वैष्णवीच्या १० महिन्यांच्या मुलीला तिच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आले आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र महिला आयोगाने हस्तक्षेप केला होता.