नाराजी व्यक्त करणाऱ्या सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, नाशिकचं राजकारण तापलं

ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपत जातात की काय अशी शक्यता व्यक्त केली असताना, महायुतीच्या काही नेत्यांकडून यावर आक्षेप नोंदवला जात आहे.

नाशिक- ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची जाहीर कबुली देणारे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. मंगळवारी पक्षात नाराज असून, आणखी १० ते १२ पदाधिकारी अस्वस्थ असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर नाशिकचे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला आणि त्यांनी बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं कारणे दाखवा नोटीसही बजावली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या कारवाईनं नाशिकचं राजकारण चांगलंच तापलंय. नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा आहे का, असा सवाल कारवाईनंतर सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केलाय.

फडणवीसांची भेट ते कारवाई

सुधाकर बडगुजर हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. संजय राऊत यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या बडगुजरांनी फडणवीस भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीनंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 पदाधिकारी अस्वस्थ असल्याचं सांगितलं होतं. यासाठी पक्ष संघटनेतील बदल कारणीभूत असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी थेट त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलीय.

ठाकरेंच्या शिवसेनेची गिरीश महाजनांवर टीका

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेते, कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेना अस्तित्वात राहणार नाही, अशी टीका केली होती. यावरुनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखांनी टीका केली. बडगुजर बाहेर पडले तरी नाशिकमधील बाळासाहबेंबाची शिवसेना संपणार नाही, असं ते म्हणालेत. काही दिवसांपूर्वी बडगुजर यांच्याविरोधात भाजपानं सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढलं होतं. आता मुख्यमंत्री बडगुजर यांना का भेटत आहेत, असा सवालही विचारण्यात आला.

पक्षविरोधी विधान केलं नाही- बडगुजर

नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा आहे का, असा सवाल कारवाई करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केलाय. नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा आपण केल्याचंही ते म्हणालेत. मात्र नाराजी व्यक्त करताना पक्षविरोधी विधान केलं नसल्याचंही बडगुजर यांनी स्पष्ट केलंय. नाराजी व्यक्त करण्याची ही शिक्षा मिळत असेल तर ती आपल्याला मान्य असल्यांही बडगुजर म्हणालेत.

बडगुजर कुठल्या पक्षात जाणार?

आता सुधाकर बडगुजर आगामी काळात भाजपत जाणार की शिंदेंच्या शिवसेनेत जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. सलीम कुत्ता प्रकरणात बडगुजर यांचे नाव घेतले गेल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा त्यांना पक्षात घेण्यास विरोध आहे. तर याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं नाशिकच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News