अकरावी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ आता सुरू होणार आहे. दहावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा असे प्रमुख शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. त्यामध्ये यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने कल वाणिज्य शाखेकडे असल्याचं दिसत आहे. यामुळे वाणिज्य शाखेचं महत्व अधोरेखित झालं आहे. त्यामुळे यंदा प्रवेशावेळी वाणिज्य शाखेचा कटऑफ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘कट ऑफ’ वाढण्याचे कारण काय?
यंदा राज्यात दहावीच्या निकालात नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजारने वाढली आहे. मागील वर्षी वाणिज्य शाखेच्या प्रवेश क्षमतेच्या तुलनेत 72.27 टक्के प्रवेश झाले होते. त्यामुळे यंदा हे कटऑफ प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यंदा वित्त व्यवस्थापन, अकाउंटंसी, कार्यक्रम व्यवस्थापन या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचं दिसून येत आहे. अलीकडच्या काळात वाणिज्य शाखेकडे विद्यार्थांचा कल वाढण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत.

वाणिज्य शाखेतील करिअरचे पर्याय
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. या शाखेतून पदवी घेतल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), कॉस्ट अकाउंटंट (CMA), आणि एमबीए (वित्त, विपणन, मानव संसाधन) यांसारखे व्यावसायिक कोर्स करता येतात. बँकिंग, विमा, वित्तीय सेवा, शेअर मार्केट, आणि इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट हे क्षेत्रेही भरपूर संधी देतात. सिव्हिल सर्व्हिसेस, यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय क्षेत्रातही जाता येते.
ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, उद्योजकता (Entrepreneurship) हे नवीन आणि विकसित होत असलेले पर्याय आहेत. लेखाशास्त्र, व्यवस्थापन, कायदा, आयात-निर्यात आणि डेटा अॅनालिटिक्स या क्षेत्रांमध्येही उत्तम करिअर घडू शकते. त्यामुळे वाणिज्य शाखा केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता, व्यापक करिअर संधी देणारी ठरते. योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी यश निश्चित आहे.