राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे; हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी, कुठे-कुठे बरसणार?

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे, पुढील पाच दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. काही भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. शेती क्षेत्राचं विशेषत: बागायती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात घट झाली आहे. राज्यात 16 मे रोजी वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. नेमका कुठे-कुठे पाऊस बरसणार? जाणून घेऊयात…

मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

राजधानी मुंबईत सातत्याने पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईत 16 मे रोजी म्हणजेच आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होण्याआधीच मान्सूनपूर्व अथवा अवकाळी पावसाचं राज्यात थैमान घातलं आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे उकाडा वाढणार आहे. पुढचे 4-5 दिवस ढगांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विजांचा चमकत असताना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्याला पुन्हा पावसाचा इशारा

मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, पुणे, सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 16 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट  जारी केला आहे.अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर आणि नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन कधी?

केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 27 मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनची अरबी समुद्रात एंट्री झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात यंदा नेहमीपेक्षा लवकर मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे. 6 जूनच्या आधीच मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News