Property Tax : मुंबईकरांच्या मालमत्ताकरांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मालमत्त कर वेळेवर जे भरत नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. दरम्यान, या अधिक पारदर्शकता यावी, यासाठी मुंबई महानगर पालिकेनं सक्रिय झाली आहे. मुंबई महानगरातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर संबंधित विविध सेवासुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता यावा तसेच कर भरणा प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ताकर संदर्भात ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे.
या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील मालमत्ताधारकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/login या संकेतस्थळावर जाऊन ‘आपले ग्राहक ओळखा’ (केवायसी) ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ऑनलाइन पद्धतीने सुविधांचा लाभ कसा?
दरम्यान, मालमत्ता कर देयके तयार होताच त्याची ‘पीडीएफ’ स्वरूपातील सॉफ्ट कॉपी करदात्यांना ‘ई मेल’द्वारे प्राप्त करता येतील. तसेच मालमत्तेची खतावणी (Property Ledger) पाहणे; मालमत्तेचे परिशिष्ट (Annexure Report) पाहणे; मालमत्ता कर देयकनिहाय थकबाकी अहवाल पाहणे; ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताधारकांना देयकांचा ऑनलाइन भरणा करणे; थकबाकी नसल्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’/देय रकमेचा भरणा केल्याचे प्रमाणपत्र पाहणे; पक्षकाराच्या किंवा मालमत्ताधारकाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे.
अधिदान केलेल्या देयकांचा अहवाल पाहणे; अधिदानाची पोचपावती पाहणे आदी सुविधांचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येईल. त्यासमवेत, प्रशासनाकडून मालमत्ता कराशी संबंधित जारी केलेल्या सूचना देखील ‘एसएमएस’ किंवा ‘ई मेल’च्या माध्यमातून प्राप्त करता येतील.
मालमत्ता कर पालिकेच्या महसुलाचा मुख स्त्रोत…
अद्यापपर्यंत अंदाजे ४ लाख मालमत्ताधारकांकडून मालमत्तांची ऑनलाईन पद्धतीने ‘केवायसी’ अद्ययावतीकरण (KYC update) करण्यात आले आहे. त्यामुळे त्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकर संदर्भात ‘एसएमएस’ / ‘ई मेल’द्वारे वेळोवेळी सूचना प्राप्त होत आहेत. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्त्रोत आहे. करनिर्धारण व संकलन खात्याकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील मालमत्तांचे करनिर्धारण करून मालमत्तांना दरवर्षी कर देयके निर्गमित करून कर संकलन केले जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता १० लाखाहून अधिक मालमत्ताधारकांना मालमत्ताकर देयके निर्गमित केली जाणार आहेत.