Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक 8.06.2025) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दरम्यान, मध्य रेल्वेवर सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन पुढील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तर डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दुसरीकडे हार्बर रेल्वेवर सुद्धा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स- हार्बर लाईन सेवा ११.०२ ते १५.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा १०.०१ ते १५.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालतील. ब्लॉक काळात ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.