Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य लोकांच्या मदतीसाठी धावून गेल्याचे अनेकवेळा पाहिलेले आहे. दरम्यान, शुक्रवारी शिंदे मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जीवनदान देणारा ठरला आहे.
क्षणाचाही विलंब न लावता शिंदेंकडून होकार…
दरम्यान, जळगावातील शीतल पाटील या किडनी विकाराने त्रस्त होत्या. या उपचारासाठी त्या विमानाने मुंबईकडे येणार होत्या. पण त्यांना विमातळवार वेळेत पोहचता आले नाही. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगावकडून मुंबईकडे जाणार असल्याचे शीतल पाटीलांना कळले. त्यांनी कार्यकर्त्याकडून मंत्री महाजन यांना त्यांची समस्या कळविली. व गिरिश महाजनांनी या महिला व तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदेंना केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदेंनी त्यासाठी होकार दिला.

‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’
दरम्यान, ही परिस्थिती शिंदेंच्या लक्षात येताच वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावमध्ये थांबतील. पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच, असे त्यांनी महाजन यांना सांगितले. यानंतर शीतल पाटील आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान उपचारांची चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत, या महिलेला रुग्णालयातही दाखल केले. यावरुन शिंदे हे आजही ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असल्याचे दिसून आले.