आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या मान्सून सक्रिय असल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि परिसराच देखील आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाचा विभागनिहाय अंदाज
5 जुलै रोजी कोकणातील समुद्रकिनारी भागांमध्ये, विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते. मुंबईत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मध्य महाराष्ट्र-मराठवाडा पावसाचा अंदाज
5 जुलै रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा भागात आज हलक्या ते मध्यम प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही निवडक ठिकाणी पावसाची नोंद होऊ शकते. दरम्यान, या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सामान्यापेक्षा थोडे कमी राहील, तर किमान तापमान सरासरीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. परिणामी, दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवू शकते.
विदर्भात पावसाची काय स्थिती?
5 जुलै रोजी विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नद्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे हवामान खात्याने सूचित केले आहे. तसेच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीजवळ राहणाऱ्यांनी भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 4 जुलै 2025 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मान्सून सक्रिय असून, पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.