पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा! कुठे अन् किती पाऊस?

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची स्थिती अशीच कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नेमकं हवामान विभागाने काय म्हटलंय? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे. सर्वदूर जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका आहे. पुढील 48 तास पावसाची स्थिती अशीच राहिलं असंही सांगण्यात आलं आहे. नेमका हवामान विभागाचा अंदाज काय आहे? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मुसळधार पाऊस बरसणार

मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, पुण्याच्या घाटमाथ्यावर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भात पावसाची स्थिती साधारण राहू शकते. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामान राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि त्याच्या घाटमाथ्यांवरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा जोर कायम

पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील 48 तासांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील दोन दिवस हे पावसाचं सत्र सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सतर्क राहा, काळजी घ्या

हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या मुसळधार पावसाचा काळात महत्वाचे काम नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. या काळात वीज अंगावर कोसळल्याने मृत्यूच्या घटना घडत असतात. त्याबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर पावसाळी पर्यटन करणे या काळात धोक्याचे आहे. शेतामध्ये काम करणारे कामगार आणि शेतकरीवर्गाने वीजांपासून विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News