पुणे: दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांच्या हालचाली सुरू होत असतात. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा पुढील काळात रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याकजे देखील मोठ्या प्रमाणात कल असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचे कोर्स करण्याला देखील विद्यार्थ्यांचे प्राधान्य असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात, आणि करिअरच्या नानाविध संधी देखील उपलब्ध असतात. आता राज्यात आजपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे, नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असणार, ते समजून घेऊ…
कसा करायचा ऑनलाईन अर्ज?
राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, तसेच प्रवेश अर्ज निश्चित करणे (कन्फर्मेशन) ही सर्व प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. उमेदवारांना प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येतील. यासाठी ‘ऑप्शन फॉर्म’ भरण्यास 26 मे 2025 पासून सुरुवात होणार आहे.

प्रत्येक उमेदवाराने एकच अर्ज भरावा, असे स्पष्ट निर्देश आहेत. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एक अर्ज स्वीकारण्यात येईल. अर्जामध्ये प्राथमिक मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक असून, त्याच क्रमांकावर ओटीपी व वेळोवेळी प्रवेशासंबंधी माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक शासकीय व खासगी आयटीआय संस्थांमध्ये दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत विनामूल्य मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आयटीआय आणि करिअरचे पर्याय
आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) कोर्स हे दहावी किंवा बारावी नंतर केले जाणारे व्यावसायिक शिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. हे कोर्स विविध तांत्रिक आणि गैर-तांत्रिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर, कॉम्प्युटर ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, टर्नर, वायरमन, डिझेल मेकॅनिक, COPA (Computer Operator and Programming Assistant) इत्यादी कोर्सचा समावेश होतो. हे कोर्स विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देतात. त्यामुळे अल्पकालीन शिक्षणानंतर नोकरी मिळवणे शक्य होते. काही कोर्ससाठी मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते. आयटीआय कोर्सच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग खुला होतो.