कोकणात मुसळधार, विदर्भ-मराठवाड्यात पावसाची काय स्थिती? हवामान विभागाचा अंदाज समोर

कोकण व घाट भागात पुढील चार, पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील पावसाचा हवामान विभागाचा अंदाज सविस्तर पाहूयात…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण व घाट भागात पुढील चार, पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं

विदर्भात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परंतु पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्ह्यत अजूनही सरासरी पाऊस नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. किमान शंभर मिमी पावसानंतरच पेरणी करा, असा सल्ला कृषी विभागाने दिला असला तरी काही भागात हलकसा पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. नागपूर जिल्ह्यात चार लाख 69 हजार 432 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 57 हजार 147 हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे.

यंदा मे महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने ब्रेक घेतला. मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. दोन्ही विभागात पावसाची तूट नोंदवली गेली. आता जुलै महिन्यात तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची तुट भरून निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News