मुंबईच्या डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. वाढती महागाई, रेल्वे आणि रस्तेवाहतुकीचे वाढलेले दर याचा फटका सर्वसामान्यांसह मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला होता. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे डबेवाले हे मुंबई आणि उपनगरांमध्ये 1890 पासून अविरतपणे घर आणि ऑफिसमध्ये असणाऱ्या मुंबईकरांची भूक भागवत आहे. दरवाढीमुळे मुंबईकरांचे दुपारचे जेवण चक्क 200 रुपयांनी महागले आहे. यामुळे नोकरदारवर्गाच्या खिशाला कात्री बसली आहे.
पाच किलोमीटरच्या आत असणाऱ्या प्रत्येक डब्यामागे आता मुंबईकरांना 1400 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे आता नोकरदारवर्गाला आर्थिक खर्चाचा अतिरिक्त भार सहन करत दुपारच्या डब्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

मुंबई आणि डबेवाल्याचे अनोखे नाते
मुंबई आणि डबेवाले यांचे नाते खूपच अनोखे आणि अभिमानास्पद आहे. मुंबईतील लाखो नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे गरम अन्न वेळेवर पोहोचवण्याचे अद्भुत काम डबेवाले गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी तयार केलेली वितरण प्रणाली जागतिक पातळीवर खूप प्रसिद्ध आहे. कोणतीही डिजिटल सुविधा नसताना, केवळ विशिष्ट चिन्हे, रंग आणि वेळापत्रकाच्या आधारे हे डबेवाले दररोज हजारो डबे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या वेळेचे नियोजन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि मेहनतीचे कौतुक जागतिक कंपन्यांनी व व्यवस्थापन संस्था देखील केले आहे.
अनेक दशकांपासून डबेवाले सेवेत
मुंबईच्या गतीमान जीवनशैलीत डबेवाले एक महत्त्वाचा दुवा ठरतात. रेल्वे, सायकल आणि पायी प्रवास करत त्यांनी मुंबई शहरात अचूक सेवा दिली आहे. 2005 मध्ये ‘प्रिन्स चार्ल्स’ यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचे काम पाहून स्तंभित झाले. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना ISO प्रमाणपत्र आणि अनेक सन्मान मिळाले आहेत.डबेवाले हे केवळ अन्न वाहून नेणारे नाहीत, तर ते मुंबईतील सहकार्य, शिस्त आणि जिद्दीचे प्रतीक आहेत. आधुनिक काळातही त्यांनी आपली परंपरा टिकवून ठेवली आहे. मुंबई आणि डबेवाले यांचे नाते म्हणजे विश्वास, मेहनत आणि समर्पणाची प्रेरणादायी गोष्ट आहे.