आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, महाराष्ट्राचा स्वतंत्र कारभार चालू लागला. बरोबर आजच्या दिवशी भाषावार प्रांत रचनेनुसार आणखी एका राज्याची निर्मिती झाली होती, आणि आज त्या राज्याचा स्थापना दिवस देखील असतो. नेमका त्यामागे काय इतिहास ?
1 मे, गुजरात स्थापना दिवस
गुजरात स्थापना दिन दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली आणि म्हणून हा दिवस गुजरातचा राज्य स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळी ‘मुंबई राज्य’ हे एक मोठं राज्य होतं, ज्यामध्ये सध्याचे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये एकत्रित होती. या राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोक एकत्र राहत होते.

गुजरात स्थापनेचा इतिहास काय?
1950च्या दशकात ‘महागुजरात आंदोलन’ या व्यापक आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनाचा उद्देश गुजराती भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य मिळवणे हा होता. त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्र असं राज्य व्हावं यासाठी देखील आंदोलन सुरू होतं. अनेकांनी त्यासाठी हौतात्म्य पत्करलं होतं. अनेक आंदोलने, उपोषणं आणि निदर्शनानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे दोन भागात विभाजन केले – एक महाराष्ट्र मराठी भाषिकांसाठी आणि दुसरा गुजरात गुजराती भाषिकांसाठी अशी दोन राज्य निर्माण झाली.
गुजरात स्थापना दिन हा दिवस राज्यातील लोकांच्या सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रम, परेड्स, सांस्कृतिक सादरीकरण, शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हरफ्रंटवर भव्य सोहळा आयोजित केला जातो, ज्यात मुख्यमंत्री, राज्यपाल व अन्य मान्यवर सहभागी होतात.हा दिवस गुजरातच्या समृद्ध वारशाचा, परंपरेचा आणि लोकांच्या एकतेचा गौरव करणारा दिवस आहे. ‘नमूं तने गुर्जरी’ ही घोषणा या दिवशी सर्वत्र ऐकायला मिळते, जी गुजरातच्या अभिमानाचे प्रतीक आहे.