Sahitya Akademi Award : साहित्य क्षेत्रातून एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे या युवा साहित्यिकाला ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेसाठी मंथन बचाणी यांच्या ‘पांधीअड़ो’ या कविता संग्रहाची ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
23 लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार…
दरम्यान, देशभरातील एकूण 23 युवा लेखकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली. तर बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 24 बालसाहित्यकारांची निवडीची घोषणा झाली आहे. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ व ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी बालसाहित्यकार कवी डॉ. सुरेश सावंत यांची त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहासाठी निवड करण्यात आली आहे.

‘खोल खोल दुष्काळ डोळे’…
मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला 2025 सालचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रदीप कोकरे यांचे लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे तसेच आधुनिक तरुणांच्या भावनांचे गहन चित्रण करते. त्यांची साधी पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचे प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते.