आनंदाची बातमी! व्हॉट्सॲपवरून मुंबईकरांना मिळणार शिव योग केंद्रांची माहिती, योग दिनानिमित्त पालिकेकडून सुविधेचा शुभारंभ

मुंबईच्या सर्व प्रभागांमध्ये पालिकेच्या शाळा, उद्याने व सामुदायिक स्थळांवर सकाळी व सायंकाळी नियमित योग सत्रे घेतली जातात. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सर्व घटकांसाठी ही सुविधा आहे. पालिकेच्यावतीने १०६ शिव योग केंद्रांमार्फत सोमवार ते शनिवार या दिवशी योग सेवा प्रदान केली जाणार

BMC – आंतरराष्ट्रीय योग दिन (दिनांक २१ जून २०२५) चे औचित्य साधत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने मुंबईकरांसाठी योग केंद्राबाबत माहिती पुरवणारी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांनी ८९९९२२८९९९ या क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधल्यास नजीकच्या परिसरातील शिव योग केंद्रांबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती मिळेल. पालिका आयुक्त भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

धावपळीच्या युगात योग महत्वाचा…

दरम्यान, धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीरासाठी थोडा वेळ काढायला हवा. दररोज नित्यनेमाने योग करायला हवा, असे आवाहन उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी यानिमित्ताने केले. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य, आरोग्यासाठी योग’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण मुंबई महानगरात विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. चॅटबॉटद्वारे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात संचालित शिव योग केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये योग सत्रांची वेळ, स्थळ आदी माहिती मराठी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

असा करा व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर

मुंबईकरांना त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील शिव योग केंद्राची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाईलमधील लोकेशन ऑन करून ८९९९२२८९९९ या क्रमांवर संदेश पाठविल्यास त्यांना विविध पर्याय उपलब्ध होतात. त्यातील ‘आरोग्य सेवा’ हा पर्याय निवडल्यानंतर पुढील संदेशात व्हॉट्सॲप चॅटबॉटकडून ‘शिव योग केंद्र’असा पर्याय दिला जातो. त्यापुढे जावून, लोकेशन शेअर करून ’शिव योग केंद्र’ असा पर्याय निवडल्यास आपल्या नजीकच्या शिव योग केंद्रांची यादी, त्यांचा संपूर्ण पत्ता, तेथील योग शिक्षकाचे नाव आणि संपर्क क्रमांक या चॅटबॉटकडून पुरविण्यात येतो.


About Author

Astha Sutar

Other Latest News