महाराष्ट्रात आज गुरुवार, 3 जुलै रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहील, त्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणसह मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी, तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 12 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दिवसभरात कमाल तापमान सुमारे 30°C आणि किमान तापमान 25°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
राज्यभरातील पावसाची स्थिती कशी असेल?
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यात आज चांगल्या पावसाची शक्यता कमीच दिसत आहे.