भाजपचे माजी आमदार आरटी देशमुख यांचे अपघातात निधन, बीड जिल्ह्यावर शोककळा

अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते.

R T Deshmukh Accident : भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. लातुरच्या औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात आज (२६ मे) सकाळी हा भीषण अपघात घडला. आरटी देशमुख हे माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते होते. देशमुख यांच्या निधनाने बीड जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की देशमुख यांना गंभीर गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघतानंतर त्यांना तातडीने लातुरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने  कार उलटली

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे त्यांच्या एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. औसा-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंडीजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे नेते

आर. टी. देशमुख हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे.

गोपिनाथरावांनंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिले

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केले.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News