आता पुन्हा एकदा बिग बॉस पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आला आहे. कारण ठरलंय, त्यानं शेअर केलेला एक व्हिडीओ. सूरज चव्हाणचा नवा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. व्हिडीओवरुन सूरजला त्याच्या स्वप्नातली बायको मिळाल्याचं दिसते आहे. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोची झलकही चाहत्यांना व्हिडीओतून दाखवली आहे. व्हिडीओ पाहून चाहते खूश झाले आहेत. पण, खरंच सुरज चव्हाणचा साखरपुडा पार पडला का? की व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे…जाणून घेऊ…
साखरपुडा नाहीच, मनोरंजनाचा हेतू
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरज मुलगी पाहायला जातो. सूरज अगदी सुटाबुटात मुलीच्या घरी जातो. त्याच्यासोबत त्याची बहीणसुद्धा आहे. मुलीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी सूरजला पाणी घेऊन येते आणि दोघांची नजरानजर होते. दोघेही पाहताच क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. लगेचच दोघांचा साखरपुडा होतो. दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहते खूपच खूश झाले. पण, तेवढ्यात येतो सूरजच्या व्हिडीओतला ट्वीस्ट. सूरज चव्हाणच्या साखरपुड्यामुळे आनंदी झालेल्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. शेवटी सूरज चव्हाण स्वप्नात असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही. व्हिडीओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं. मात्र, व्हिडीओच्या शेवटी सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडीओत दिसलं. त्यामुळे सूरजसोबतच चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. सूरजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सुरज घराच्या कामात व्यस्त
दरम्यान, बारामतीच्या मोडवे गावातला सूरज टिकटॉकमुळे लोकप्रिय झाला. त्याचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले. याच जोरावर तो बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. पण आई-वडिलांचं छत्र नसलेल्या सूरजनं गरिबीत दिवस काढले. गावात एका खोलीचं घर. पण आता त्याचं मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण होत आहे. अनेकांनी त्याला या घरासाठी मदत केली आहे. तर पुढच्या वर्षी हे घर बांधून तयार होईल, असं म्हटलं जात आहे.