Eknath Shinde – भारताने जशाच तसे उत्तर दिले. दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने आज पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र ऑपरेशन सिंदूर हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आज कौतुक केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील पाच नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते संजय निरुपम, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते.

घरात घुसून मारु…
आजचा एअर स्ट्राईक हा ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे. पूर्वी आपल्या जवानांचा शिरच्छेद करुन पाकिस्तानात घेऊन जाण्याचे पाप दहशतवाद्यांनी केले होते. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी पाकड्यांना प्रत्युत्तर दिले नव्हते. दहशतवादी हल्ल्यानंतर ते मूग गिळून बसले होते, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला हा नवा भारत आहे. घरात घुसून मारु अशा प्रकारची प्रतिक्रिया देणारा हा भारत आहे.
सर्व देशवासीय मोदीजींच्या पाठिशी…
खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिंपरी चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवकांनी आणि लोणावळा नगरपरिषेदतील दोन नगरसेवकांनी शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेतला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर आज एअर स्ट्राईक करताना आपल्या सैन्याने पाकिस्तानातील निरपराध नागरिकांची काळजी घेतली. यापुढे देखील पाकड्यांना असेच चोख उत्तर मिळेल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण सर्व देशवासीय मोदीजींच्या पाठिशी उभे आहेत असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.