Eknath Shinde – आज पुण्यात एकनाथ शिंदेंनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यावरती एक हिंदीत कविता म्हटली. यानंतर भाषणाचा समारोप करताना त्यांनी जय हिंद… जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. ‘जय गुजरात’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटले. यावरुन विरोधकांनी शिंदेंवर टिका केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ही उद्धव ठाकरे यांचा ‘जय गुजरात’चा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत पलटवार केला आहे.
… मग काय केम छो म्हणायचे
एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत असताना, जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला एकनाथ शिंदेंना लगावला आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राच्या भूमीवर राहतो… आणि तेही पुणे म्हणजे सांस्कृतिक माहेरघर आहे. अशा पुण्याच्या भूमीत जय गुजरात म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणजे आता एकनाथ शिंदे भेटल्यानंतर त्यांना ‘केम छो शिंदे साहेब…सारो छे… असं म्हणायचं का? असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे लगावला आहे.

सरकारचा दुतोंडी चेहरा समोर…
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे, एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात नाऱ्यामुळे सरकारचा खरा चेहरा आणि सरकारची वास्तविकता समोर आली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घ्यायची आणि दुसरीकडे जय गुजरात म्हणायचे… हा सरकारचा दुतोंडी चेहरा समोर आला आहे. हे महाराष्ट्राच्या भूमीत जरी म्हणजे पंतप्रधान आले तरी त्यांनाही जय महाराष्ट्र म्हणावे लागेल. पण राजाच्या उपमुख्यमंत्री यांनी जय गुजरात म्हटले याचा आम्ही निषेध करतो, असा प्रहार काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला आहे.
‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’
दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ‘जय गुजरात’ हा शिवसेनेकडून जूना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचे दिसते आहे. सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे.
केवळ मतांसाठी…
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.