मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे ही शासनाची प्रामाणिक भावना आहे. गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एनटीसीसमवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील…
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात देखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १५ हजार ८७० घरे गिरणी कामगारांना दिली. आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार पात्र असून त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील. मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते. यासाठी एनटीसीसोबत बैठक घेण्यात येणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर…
दुसरीकडे यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या काही प्रतिनीधींनी सेलू भागात बांधलेल्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या माध्यमातून एमएमआर परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत गिरणी कामगारांनी एमएमआर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.