राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याकडून विदर्भाला ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेन्ज अलर्ट जारी कऱण्यात आला असून उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे समजून घेऊ…
विदर्भात पावसाची संततधार; शेतकरी सुखावला!
मुंबई, कोकण, पुण्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी विदर्भात मात्र गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाने विदर्भाला झोडपून काढलं आहे. संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात काहीसे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना आज भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. या पाचही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मराठवाड्यातील जालना आणि परभणी या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, सोलापूर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून विविध भागांत पावसाने कहर केला असून पुढील चार दिवस विविध विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे एकंदरीत आगामी काही दिवसांत पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या पावसाने ब्रेक दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/0qdnckwql7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 10, 2025